देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्यासाठी आणि भारतीय उत्पादनांची आंतरराष्ट्रीय पोहोच वाढवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एमएसएमई’ने (ni-msme) नवउद्योजक व पहिल्यांदाच निर्यातीत उतरणाऱ्यांसाठी ‘निर्यात समर्थ’ (Niryat Samarth) या विशेष क्षमता बांधणी कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

हा उपक्रम केंद्र सरकारच्या एक्सपोर्ट प्रमोशन मिशन (EPM) अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या ‘निर्यात दिशा’ (NIRYAT DISHA) योजनेचा भाग आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारातील कागदपत्रे, कायदेशीर प्रक्रिया, विदेशी बाजारपेठेतील नियम आणि संधी समजून घेण्यासाठी हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

५ दिवसांचे अनिवासी निवासी प्रशिक्षण; भोजन व निवासाची मोफत सोय

उद्योजकांना प्रत्यक्ष आणि सखोल ज्ञान मिळावे यासाठी हा ५ दिवसांचा अनिवासी (Residential) प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रातील तज्ज्ञ, वित्त सल्लागार आणि निर्यात क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक मार्गदर्शन करतील.

प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची (Boarding & Lodging) व्यवस्था ni-msme तर्फे मोफत केली जाणार आहे. यामध्ये निर्यात सज्जता, आंतरराष्ट्रीय दर्जा मानके, पॅकेजिंग, आयात-निर्यात परवाने आणि परकीय चलनाशी संबंधित नियमांचे सविस्तर प्रशिक्षण दिले जाईल.

प्रमुख सात क्षेत्रांवर विशेष भर

निर्यातीला गती देण्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रामुख्याने खालील सात उत्पादन क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे:

  • खेळणी आणि बाहुल्या (Toys & Dolls): स्थानिक खेळणी उद्योगाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांनुसार तयार करणे.

  • वैद्यकीय उपकरणे (Medical Devices): जागतिक प्रमाणपत्रे, गुणवत्ता नियंत्रण आणि वैद्यकीय उपकरणांची निर्यात.

  • जनरल इंजिनिअरिंग (General Engineering): आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीत भारतीय इंजिनिअरिंग उत्पादनांचा सहभाग वाढवणे.

  • सुगंध आणि स्वाद (Fragrance & Flavour / Perfumery): नैसर्गिक आणि प्रक्रिया केलेल्या सुगंधी उत्पादनांना विदेशी बाजारपेठ मिळवून देणे.

  • चर्मोद्योग (Leather): मूल्यवर्धित चामड्याच्या वस्तू आणि शाश्वत उत्पादन प्रक्रियेला चालना.

  • रत्न आणि दागिने (Gems & Jewellery): पारंपरिक आणि डिझायनर दागिन्यांची उच्च मूल्य असलेल्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात.

  • काथ्या उद्योग (Coir): पर्यावरणपूरक कॉयर उत्पादनांची जागतिक मागणी पूर्ण करणे.

पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

या कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतातील संबंधित क्षेत्रांतील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक, उत्पादक आणि नवउद्योजक अर्ज करू शकतात.

सर्व नव्याने निर्यात करू इच्छिणाऱ्यांसाठी ही संधी खुली असली, तरी वार्षिक उलाढाल ₹५ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या उद्योजकांना प्राधान्य दिले जाईल, असे अधिकृत अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणासाठी जागा मर्यादित असल्याने इच्छुक उद्योजकांनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार [https://www.nimsme.gov.in/niryat-samarth](https://www.nimsme.gov.in/niryat-samarth] या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. पुढील वेळापत्रक आणि प्रशिक्षणाचे ठिकाण निवड झालेल्या अर्जदारांना थेट कळवले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *