“कोणतेही क्षेत्र महिलांसाठी वर्ज्य नाही. अडचणींवर मात करून लढायला हवे, यश नक्की मिळते.” – मीना लांडगे
जिद्द, कष्ट आणि ध्येयाने आयुष्याचा प्रवास बदलता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे सिन्नर तालुक्यातील मीना लांडगे. कधीकाळी संसाराचा गाडा ओढण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मीना आज ३५ लाखांच्या आलिशान बसच्या मालकीण झाल्या आहेत.
लहानपणापासूनच गाड्यांची आवड असलेल्या मीना यांचे वडील लवकरच वारले. नववीत असतानाच त्यांचे लग्न झाले आणि स्वप्नांना विराम मिळाला. मात्र, त्यांनी हार मानली नाही. २०१८ मध्ये त्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि हा त्यांच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट ठरला.
दहावी पास झाल्यानंतर त्यांनी एसटी महामंडळात चालक म्हणून नोकरी केली. नंतर नाशिकमध्ये ‘सिटी लिंक’ बस चालवताना त्यांनी आपल्या दोन मुलींचे शिक्षण पूर्ण केले. पण स्वतःचा व्यवसाय असावा ही ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
शेतीत घाम गाळून त्यांनी अवघ्या सहा हजार रुपयांच्या भांडवलातून कोबीचे पीक घेतले आणि लाखाचे उत्पन्न मिळवले. त्यातून मिळालेल्या भांडवलासोबत सरकारच्या ‘आई’ योजनेतून मिळालेले १५ लाखांचे बिनव्याजी कर्ज, स्वतःचे साडेचार लाख आणि बँकेचे कर्ज अशा एकूण ३५ लाखांच्या भांडवलातून त्यांनी ‘फोर्स अर्बानिया’ ही १७ सीटर आलिशान एसी गाडी खरेदी केली.
या प्रवासात त्यांना पती भगवान लांडगे आणि मानलेले भाऊ सुभाष चकोर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आज मीना संपूर्ण भारतभर पर्यटकांना घेऊन जाण्यास सज्ज आहेत.