नवी दिल्ली, २३ मार्च – सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी संसदेत माहिती दिली की सरकारने डिजिटल व्यापाराला चालना देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘टीम’ (Trade Enablement and Marketing) उपक्रमांतर्गत २०२४ ते २०२७ दरम्यान तब्बल ५ लाख सूक्ष्म व लघु उद्योगांना ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) वर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
करंदलाजे यांनी सांगितले की, अलीकडील धोरणात्मक बदलांमुळे एमएसएमईंना जागतिक व्यापारात सहभागी होण्याची संधी अधिक मिळणार आहे. विशेषतः, २०२६–२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात कुरिअर निर्यातीवरील १० लाख रुपयांच्या मर्यादेचे बंधन हटवण्यात आले आहे. यामुळे कारागीर, स्टार्टअप्स आणि लघु उद्योगांना मोठ्या प्रमाणात माल पाठवणे सुलभ होईल, तसेच लॉजिस्टिक खर्च कमी होईल आणि नियमांचे पालन करणे सोपे होईल.
‘टीम’ उपक्रमाची अंमलबजावणी या योजनेअंतर्गत राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ व राज्य सरकारे देशभरात जनजागृती कार्यशाळा आयोजित करतील. विक्रेता नेटवर्कच्या माध्यमातून उद्योगांना ओएनडीसीवर जोडले जाईल. उद्योग संघटनांचा पाठिंबा, ‘टीम’ पोर्टलवर स्वयं-नोंदणीची सुविधा आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष हेल्पडेस्क उपलब्ध करून दिले जाणार आहे.
डिजिटल सहभाग वाढतोय करंदलाजे यांनी स्पष्ट केले की ओएनडीसी फ्रेमवर्कअंतर्गत व्यापाऱ्यांचा सहभाग झपाट्याने वाढतो आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सुमारे २.०६ लाख व्यापाऱ्यांनी किमान एक व्यवहार पूर्ण केला आहे, तर ६ लाख सेवा पुरवठादारांना नेटवर्कवर सामील करण्यात आले आहे. याशिवाय, ३,१२७ एमएसएमईंनी चालू आर्थिक वर्षात एक लाखांहून अधिक व्यवहार नोंदवले आहेत.
या उपक्रमामुळे देशातील लघु उद्योगांना डिजिटल बाजारपेठेत प्रवेश मिळेल, निर्यात वाढेल आणि जागतिक स्पर्धेत टिकून राहण्याची क्षमता निर्माण होईल, असे सरकारचे मत आहे.